top of page

खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन (Working Capital Management)





खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी सर्वप्रथम “खेळते भांडवल” म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया.


खेळते भांडवल म्हणजे काय ?


एखाद्या व्यवसायात असणाऱ्या सर्व चालू मालमत्ता (Current Assets) वजा चालू दायित्व (current liabilities) म्हणजे त्या व्यवसायाचे खेळते भांडवल.


खेळते भांडवल = चालू मालमत्ता - चालू दायित्व

चालू मालमत्ता

म्हणजे ज्या मालमत्ता 12 महिन्यांच्या काळात सहजपणे रोखीमध्ये रूपांतरण करता येतील त्या मालमत्ता.

चालू दायित्व 

म्हणजे जे दायित्व बारा महिन्यांच्या काळात देणे बंधनकारक आहे ते दायित्व.

उदाहरणार्थ:

  • रोकड (cash)

  • रोखीत परावर्तित करता येऊ शकणारी म्हणजेच समतुल्य मालमत्ता (cash equivalent),

  • व्यावसायिक येणे,

  • अग्रीम रक्कम; तसेच

  • पुढील वर्षासाठी केलेले खर्च (advance/ prepaid expenses) आदी.

उदाहरणार्थ:

  • व्यावसायिक देणे,

  • एक वर्षाच्या आत देय असलेले बँकेचे हप्ते किंवा इतर कर्ज,

  • वर्ष अखेर करायच्या तरतुदी, आदी

खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन :


खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन म्हणजे काय, हे साध्या शब्दात सांगायचे तर त्या व्यवसायासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व आर्थिक संसाधनांचा (financial resources) पुरेपूर वापर करून व्यवसाय वृद्धी करून चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून जास्तीत जास्त नफा कमावणे हा होय. अर्थात, एखाद्या व्यवसायात किंवा संस्थेमध्ये नफा कमावणे हा उद्देश नसेल, तरीही खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते.


खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन असेल, तर सर्व अल्पकालीन दायित्व व कमी काळात द्यायची कर्जे, परतफेढीसाठी आवश्यक त्यावेळेस व आवश्यक त्या प्रमाणात रोख निधी उपलब्ध असू शकतो; किंबहुना ही त्याच्या नियोजनाची महती दर्शविते. जी कर्जे किंवा जे खर्च या कालावधीनंतर करायचे आहेत त्याचीही उत्तम तरतूद करता येऊ शकते. यासाठी सनदी लेखापाल (CA) सारखे आर्थिक सल्लागार मोलाची मदत करू शकतात.


आपले खेळते भांडवल योग्य म्हणजे पर्याप्त आहे किंवा जास्त आहे किंवा कमी आहे हे ठरवण्यासाठी वेगवेगळे गुणोत्तर प्रमाण आहेत. उदाहरणार्थ : जंगम मालमत्तांचे अल्पकालीन दायित्व सोबत असलेले गुणोत्तर प्रमाण हे कमीत कमी १ व जास्तीत जास्त २ असले पाहिजे. ते जर १ पेक्षा कमी असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की कंपनी चालूदायित्व ठरलेल्या वेळेत देण्यास सक्षम नाही. आणि जर ते २ पेक्षा जास्त असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की कंपनी उपलब्ध असलेल्या जंगम मालमत्तेचा उत्तम विनियोग करीत नाही किंवा उत्तम विनियोग करण्यास सक्षम नाही.


आपल्या व्यवसायात उपलब्ध असणाऱ्या आर्थिक निधी पैकी योग्य रक्कम तरलता म्हणून ठेवणे व योग्य रक्कम स्थिर, जंगम व स्थावर मालमत्ता यामध्ये गुंतवणे म्हणजे खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन करणे असे म्हणता येईल. 


खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन राहावे म्हणून बँक किंवा पतसंस्था किंवा इतर अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या व्यवसायास खेळत्या भांडवलासाठी कर्ज देते, तेव्हा कर्जदारास प्रत्येक महिन्यात ‘मालसाठ्याचा तक्ता’ (Stock Statement) किंवा पत्रक जमा करावे लागते. या साठ्याच्या रकमेत केवळ पूर्ण रक्कम देऊन खरेदी केलेला माल असावा लागतो. जर तसे नसेल, तर पुरवठादार विक्री दराची रक्कम मालसाठ्या मधून वजा करावी लागते या माल साठ्याची खरेदीची किंमत स्पष्ट करावी लागते. काही वेळा मालसाठ्याची रक्कम फुगवून दिसण्यासाठी विक्री किंमतीला दर्शविली जाते, जे बँकिंग तत्त्वाच्या विरोधात मानले जाते. अशी मालाच्या साठ्याची किंमत शोधून काढल्यानंतर बँक त्यांची मार्जिन रक्कम सर्वसाधारणपणे 25 ते 30 टक्के वजा करते. याखेरीस जर तारण म्हणून व्यावसायिक ऋणकोकडून पैसे येणे असतील, त्यासाठी देखील नियम लावले जातात व त्यानंतर वित्तीय पुरवठादार किंवा बँका त्याच्या आधारे प्रत्येक महिन्यात एकूण मान्य कर्जापैकी किती रक्कम कर्ज म्हणून वापरता येईल, हे ठरविते.


उदाहरणार्थ ‘अ’ या कर्जदारास बँकेने रुपये दहा लाख इतकी कर्ज मर्यादा मंजूर केलेली आहे. डिसेंबर 2023 अखेर कर्जदाराकडे 15,00,000 चा साठा शिल्लक आहे. त्याचे पुस्तकी येणे पाच लाख इतके आहे. व देणे दहा लाख इतके आहे. अशा परिस्थितीत खालील चौकटीप्रमाणेच रक्कम या खातेदारास वापरता येईल. जरी त्याची मान्य कर्ज मर्यादा अधिक असली तरी थोडक्यात सोबतच्या तक्त्या दर्शविला प्रमाणे यास साठा दहा लाख अधिक येणे पाच लाख वजा दहा लाख अल्पकालीन देणे गुणिले ७०/१०० म्हणजे रुपये सात लाख इतक्या रकमेचा वापर जानेवारी 2023 साठी करता येईल.

विवरण

रक्कम (रु)

साठा

15,00,000

+ पुस्तकी येणे

5,00,000

- देणे

10,00,000

नेट

10,00,000

मार्जिन

30%

जानेवारी 2023 साठी कर्ज मर्यादा

7,00,000

रिजर्व बँकेने तसेच सहकारी बँकांसाठी महाराष्ट्र सरकारच्या सरकार खात्याने मर्यादा घालून दिलेले आहेत. त्याला “सीडी रेशो” संबोधले जाते. तो 70 पेक्षा कमी नसावा किंवा 80 पेक्षा जास्त नसावा असे बंधन आहे. जर तो 70 पेक्षा कमी असेल तर ते वित्तीय संस्था उपलब्ध निधी सक्षम पद्धतीने वापरत नाही असा होईल. जर 80 पेक्षा जास्त असेल तर वित्तीय संस्था आर्थिक संकटात येऊ शकते. रिझर्व बँक तसेच सहकार खाते देखील कर्जदारांच्या खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनावर लक्ष देते हे यावरून दिसून येते.


सर्वसामान्यपणे हा प्रश्न पडू शकतो की व्यवसायाचा नफा जास्तीत जास्त असला, म्हणजे भविष्यात व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात येणार नाही. पण हा समाज चुकीचा आहे. जास्त नफा कमवणे हा एक उद्देश असला, तरी त्याचबरोबर व्यवसायात तरलता म्हणजे जंगम मालमत्ता पुरेशी असणे महत्त्वाचे आहे. भरपूर नफा असला पण पुरेशी तरंगता नसेल, तर खूप व्यवसाय दिवाळखोरीमध्ये निघू शकतात, किंबहुना निघाले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बांधकाम क्षेत्रात तेजी असताना बऱ्याच बांधकाम व्यवसायिकांनी तरलता न ठेवता सर्व जंगम मालमत्ता खर्चून, तसेच भरपूर कर्ज घेऊन खूप जागा खरेदी करून ठेवल्या. पण नंतर मंदीच्या काळात ते बांधकाम व्यवसाय तग धरू शकले नाहीत. बरेच व्यवसाय खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडले. सारांश सांगायचा म्हणजे यशस्वी होण्यासाठी आपल्याकडच्या उपलब्ध निधीचा उत्तम वापर म्हणजेच खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन.


वैयक्तिक जीवनात किंवा नफा कमवण्याच्या उद्देश असणाऱ्या छोट्या किंवा मोठ्या व्यवसायामध्ये किंवा नफा कमवण्या च्या उद्देश नसणाऱ्या संस्थेमध्ये खेळत्या भांडवलाचे नियोजनाचे अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तोच यशाचा गाभा मानला गेला आहे.



43 views0 comments

Comentários


bottom of page